दोडामार्ग,दि.२३ : गावातील तंटे सामोपचाराने मिटवून गावात शांतता व सलोखा राखण्यासाठी कार्यरत असलेल्या झोळंबे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुखाजी सोमा गवस यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. गेल्या १८ वर्षांपासून ते या पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या या फेरनिवडीबद्दल संपूर्ण गावच्या ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
सुखाजी गवस यांनी त्यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळात अनेक गुंतागुंतीचे तंटे आणि वाद सामोपचाराने मिटवले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे गावात शांतता व एकोपा टिकून राहिला आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याबद्दल आणि योगदानाबद्दल ग्रामस्थ नेहमीच त्यांचे कौतुक करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा सर्वानुमते त्यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली.
यावेळी शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, व गावातील ग्रामस्थांनी सुखाजी गवस यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झोळंबे गाव यापुढेही तंटामुक्त राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
झोळंबे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुखाजी गवस यांची पुन्हा बिनविरोध निवड

