गाभण म्हैस दगावली ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
सावंतवाडी, दि.२५: तालुक्यातील शिरशिंगे,मळईवाडी येथे बुधवार २३ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी जगन्नाथ सोनू राऊळ यांच्या गोठ्यावर झाडाची फांदी कोसळून गोठा पूर्णपणे जमीनदोस्त झाला. या दुर्घटनेत गोठ्यात असलेली एक गाभण म्हैस जागीच ठार झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे अंदाजे ६५,००० रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि बाधित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी सरपंच दीपक राऊळ आणि पोलीस पाटील गणू राऊळ यांनी केली आहे.
या आपत्कालीन परिस्थितीत शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी राऊळ यांनी व्यक्त केली आहे.

